अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच देवीदास शिर्के यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव फेटाळला. दरम्यान ज्यांनी अविश्वास ठराव आणला होता
त्यातील काहीजण यावेळी उपस्थित राहिलेच नाही त्यामुळे श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मतदान होऊन हा अविश्वास ठराव फेटाळण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी उपसरपंच देवीदास गणपत शिर्के यांच्याविरुद्ध ९ ग्रामपंचायत सदस्यांनी कामात ढवळाढवळ करत, महिला सरपंचावर वरीष्ठांकडून दबाव आणत काम करण्याच्या कारणावरून श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्याकडे अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल केला होता.
त्यामुळे तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी मंगळवारी पेडगाव ग्रामपंचायत येथे याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या अविश्वास ठरावाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडीत ठराव दाखल करणाऱ्या
गटाचे काही सदस्य गैरहजर राहिल्याने १० सदस्य प्रत्यक्ष हजर राहत ८ जणांनी मतदान केल्याने शिर्के यांचे विरुद्धचा अविश्वास ठराव फेटाळला गेला.
उपसरपंच देवीदास गणपत शिर्के यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव फेटाळला गेल्याने कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.