अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावानंतर विशेष सभा बोलावण्यात आली होती.
त्यात उपस्थित 17 सदस्यांसह सरपंचांचे मतदान घेतल्यानंतर ठरावाच्या बाजूने 16 मते पडल्याने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते.
मागील मोठ्या कालावधीपासून घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्याविरोधात सदस्यांमध्ये खद्खद् सुरू होती.
त्यानुसार सोमवारी अध्यासी अधिकारी तथा संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या अध्यक्षतेखाली घुलेवाडी ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेला सरपंच व 17 सदस्य असे सर्व 18 जण उपस्थित होते.
यावेळी अविश्वास ठरावाच्या नोटीसमध्ये नमूद मुद्यांवर सर्वांची मते जाणून घेण्यात आली. सरपंच सोपान राऊत यांनीही आपली बाजू मांडली.
त्यानंतर अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. यावेळी 16 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने तर अवघ्या दोघांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. ठरावाच्या बाजूने तीन चतुर्थांशपेक्षा अधिक मते असल्याने सदरचा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.
याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकार्यांना पाठविण्यात आला आहे. या विशेष सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून तहसीलदार अमोल निकम यांनी कामकाज पाहिले.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील आदेशानुसार घुलेवाडीतील ग्रामसभेत याबाबत मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
आता मतदान प्रक्रियेनंतरच घुलेवाडीचे सरपंचपद रिक्त होईल किंवा नाही हे चित्र स्पष्ट होणार आहे.