कोरोनाला ‘नो एंट्री’… जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील ४५ गावे कोरोनामुक्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. यातच आता कोरोनाची लाट ओसरू लागल्याने जिल्हा अनलॉक देखील करण्यात आला आहे.

यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एक – दोन नव्हे तर तब्ब्ल ४५ गावे हि कोरोनामुक्त झाली आहे.

राहुरी तालुक्यातील १०२ गावांपैकी तब्बल ४५ गावे करोनामुक्त झाली आहेत. तर ३३ गावांची वाटचाल करोनामुक्तीकडे यशस्वीपणे सुरू आहे.

उर्वरित २४ गावेही लवकरच करोनाच्या विळख्यातून मुक्त होतील, असा आशावाद प्रशासनाने व्यक्त केला असून नागरिकांच्या दृष्टीने तालुक्यात एकंदर आशादायक दिलासा देणारे चित्र निर्माण झाले आहे. करोनाने ग्रामीण भागातही आपले हातपाय पसरले होते.

त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातही करोनाचा धुमाकूळ सुरूच होता. पर्यायाने अनेक गावात कोविड सेंटर सुरू करावे लागले.

ग्रामीण भागात ग्रामस्थांनीही करोना महामारीला सामोरे जाताना अनेक उपाययोजना केल्या, सावधानता बाळगली, प्रशासनाचा आदेश पाळला.

त्यामुळे करोना महामारी ग्रामीण भागात आटोक्यात आली आहे. तालुक्यात एकूण १३ हजार १९७ बाधित रूग्ण होते.

तर बळींची संख्या १९६ वर जाऊन पोहोचली होती. सध्या सक्रिय रूग्ण ३०४ असून १२ हजार ६९७ रूग्णांवर उपचार पूर्ण होऊन ते बरे झाले आहेत.

त्यामुळे करोनाच्या तावडीतून तालुक्याची सुटका होत असताना ४५ गावे करोनामुक्त झाले असून ३३ गावांची वाटचाल करोनामुक्तीकडे सुरू आहे. तर उर्वरित २४ गावांमध्ये बाधितांचे प्रमाण ६ रूग्णांपेक्षा जास्त आहे.

अहमदनगर लाईव्ह 24