अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- कोरोनाचे कारण सांगून जिल्हा रुग्णालयातून सर्रासपणे रुग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल होण्याचा अजब गजब सल्ला दिला जातोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयाने प्रसुतीसह इतर रुग्ण दाखल करून घेण्याचे बंद केले आहे.
त्यामुळे साधारण दीड वर्षांपासून कोरोनावगळता जिल्हा रुग्णालयात इतर रुग्णांना ‘नो एंट्री’ आहे. याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. असाच काहीसा अनुभव विठ्ठल सुखदेव नरवडे (रा. टाकळी खातगाव) या नागरिकाला आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्री. नरवडे आपल्या घराजवळील शेतात गवत कापणीचे काम करत होते.
त्यावेळी घोणस जातीच्या विषारी सापाने त्यांचा चावा घेतला. त्यावरील प्राथमिक उपचार घेण्यासाठी त्यांनी तत्काळ गावातील आरोग्य उपकेंद्रात धाव घेतली. मात्र, तेथील सुविधांचा अभाव लक्षात घेता तेथील रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय तेथील आरोग्य अधिकारी यांनी घेतला. श्री. नरवडे हे जिल्हा रुग्णालयात आले असता
त्यांना ‘येथे कोरोनाचे रुग्ण असल्याने दाखल करून घेता येत नाही’ असे सांगून विखे हॉस्पिटलला जावे, अशी लेखी शिफारस करण्यात आली. मात्र, तिथेही आयसीयू बेड उपलब्ध नव्हते. तेथूनही त्यांना परत जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान ह्या प्रकाराची माहिती रुग्णाचे नातेवाईक महादेव गवळी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना फोनहून दिली.
त्यावर डॉ. पोखरणा यांनी रुग्णालयात या, दाखल करून घेण्याची व्यवस्था करतो, असल्याचे सांगितले. मात्र, तरी देखील डॉ. घुगरे यांनी दाखल करून घेतांना ‘तुमची कोरोना चाचणी करून घ्या, तुमच्यासाठी स्वतंत्र वार्ड मिळणार नाही, कोरोना वार्डात उपचार घ्यावे लागतील. दरम्यान काही बरं – वाईट झालं तर त्याची जबाबदारी तुमची असेल, तसे लेखी हमीपत्र द्यावे लागेल’ अशी बतावणी करून नरवडे यांच्या मनात कोरोनाविषयीची भीती निर्माण केली.
त्यामुळे नाईलाजाने त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेणे पसंत केले. सर्पदंशाच्या उपचाराची औषधे ही बरीच महाग असल्याने आणि नरवडे यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खाजगी हॉस्पिटलचे प्रिस्क्रिप्शन घेऊन त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातून ही औषधे मिळवीत, अशी विनंती केली.
त्यावर ‘अशा पद्धतीने औषधे बाहेर देता येत नाहीत. तुम्हाला तर इथं दाखल व्हायला सांगितले होते. तुम्ही काय आम्हाला विचारून तिथे गेलात काय’ असे बेजाबदारपणे बोलून डॉ. घुगरे यांच्याकडून नातेवाईकांना काढून देण्यात आले. या प्रकाराची श्री. विठ्ठल नरवडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून जिल्हा रुग्णालयात होणाऱ्या गैरकारभाराकडे लक्ष वेधले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून सर्रासपणे रुग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला जात असल्याने अनेक गोरगरीब रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, संबधित दोषी आढळून येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा सावळा गोंधळ
दरम्यान जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेताना टाळाटाळ करताना सेवेतील अधिकारी डॉ. घुगरे यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक वासिम शेख यांचा मोबाईल नंबर दिला. ‘त्यांच्याशी संपर्क करा, ते योजनेत बसवतील. खाजगी रुग्णालयात दाखल व्हा, मोफत उपचार होतील’ असे सांगितले.
मात्र, शेख यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ‘जर रुग्ण अति गंभीर स्थितीत असेल तरच योजनेत उपचार होतात, अन्यथा खाजगी रुग्णालयाच्या आकारणीप्रमाणे बील अदा करावे लागेल,’ या अटीवर खाजगी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला असल्याचे श्री. विठ्ठल नरवडे यांनी सांगितले. सर्पदंश झालेल्या रुग्णाला तातडीने उपचार मिळणे गरजेचे आहे
अशा परिस्थितीत केवळ योजनेत उपचार व्हावे म्हणून रुग्ण अति गंभीर परिस्थितीत जाण्याची वाट पहावी काय, असा प्रश्न श्री. नरवडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच वासिम शेख हे वेळेत फोन उचलत नाहीत.व्यवस्थित मार्गदर्शन करत नाहीत, त्यांची चौकशी करण्यात यावी. आरोग्य योजनेत कायद्याचा धाक निर्माण करून वचक बसवावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे नरवडे यांनी केली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे नुकसानभरपाईची मागणी
संबधित प्रकरणानंतर श्री. विठ्ठल नरवडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना तक्रारीचे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘प्रत्येक नागरिकाला किमान दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आपले कर्तव्य आहे. भारतीय नागरिक या नात्याने चांगली आरोग्य सुविधा मिळणे हा माझा मुलभूत अधिकार आहे.
आपण मला आरोग्य सेवा नाकारून ‘आरोग्य सेवा मिळविण्याच्या हक्कापासून वंचित ठेवले आहे.’ त्यामुळे नाईलाजाने मला खाजगी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. मला औषधोपचारासाठी १९,२४१ रुपये तर रुग्णालयाच्या बिलापोटी ७,३१० रुपये असे एकूण २६,५५१ रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसला आहे.माझी आर्थिकस्थिती ही हलाखीची व बेताची असल्याने ऐनवेळी उपचारासाठी नातेवाईकांकडून उसने स्वरुपात कर्जाऊ घेतले आहेत.
जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेतील कर्मचारी- अधिकारी यांनी आडमुठेपणा करून कर्तव्य बजावणीत कसूर केला आहे. संबधितांवर आपण योग्य कार्यवाही करावी.या घटनेची नैतिक जबाबदारी आपल्यावर आहे. संबधित प्रकरणाची सखोल चौकशी करून आर्थिक नुकसान भरपाईपोटी २६,५५१ रुपये मिळावेत, अशी मागणी नरवडे यांनी केली आहे.