फरार बोठे सापडेना… रेखा जरेंच्या मुलाने घेतला हा निर्णय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- यशस्विनी ब्रिगेडच्या संस्थापिका रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याचा शोध अद्यापही लागलेला नाही आहे.

आरोपीला अटक होत नसल्यामुळे आता रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. रुणाल जरे याने आज, सोमवारी जिल्हा प्रशासनाला व पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांना पत्र दिले आहे. त्यामुळे आता पोलीस काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

यामध्ये म्हटले आहे की,’ यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ ज बोठे याला अदयापपर्यंत अटक झालेली नाही. गुन्हा घडल्यापासून मुख्य सुत्रधार हा अदयापपर्यंत फरार आहे. तसेच त्याचा ठावठिकाणा देखील पोलिसांना सापडत नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा काय करते? असा प्रश्न मला पडला आहे.

पोलीस कुठे हतबल होत आहे का? तसेच एलसीबीचे सक्षम पोलीस अधिकारी एखादया सराईत गुन्हेगारास पकडण्यास सर्व पोलीस यंत्रणा कामास लावतात, व त्यास पकडून हजर करतात. परंतु सदर मुख्य सुत्रधार व इतर गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार हे वेगळे असतात का? असा प्रश्न उपस्थित होतो.

मला न्याय कसा मिळेल? अद्यापपर्यंत पोलीस अधिक्षक व तपास अधिकारी साहेब यांना वेळोवेळी भेटून तपासाबाबत विचारपूस केली असता मला अद्यापपर्यंत कोणतीही मुख्य सुत्रधार पकडण्याची हमी दिली नाही. त्यामुळे मला यापूढे कोणताही मार्ग सापडत नाही. सदर गुन्हा घडल्यापासून आजपावेतो मुख्य सुत्रधार बाळासाहेब बोठे सापडत नाही.

75 दिवसाचा कालावधी होऊन गेला आहे. 90 दिवसांत चार्जशिट दाखल करण्याची तयारी देखील चालू झाली असेल. नगरचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार यांनादेखील याबाबत निवेदन दिले आहे. एवढे करून देखील मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा मिळून येत नाही.

त्यामुळे मला उपोषण करण्यापलिकडे कोणताही पर्याय राहिलेला नाही. त्याशिवाय माझ्या आईला न्याय मिळणार नाही, असे मला वाटते. तरी विनंती की, मला व माझ्या कुटुंबियांसमवेत व हितचिंतकासोबत आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची परवानगी मिळावी ही नम्र विनंती,’ असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24