file photo

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- गणेशाेत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने शासनाचे सार्वजनिक उत्सव, विसर्जन मिरवणूका, आरस देखावे आदी कार्यक्रमांवर निर्बंध आहेत.

पाथर्डी तालुका प्रशासनाने आज गणेश मंडळासोबत झालेल्या बैठकीत गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीवर संपुर्णत: बंदी असल्याचे स्पष्ट संकेत दिल्याने गणेश भक्तांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण आहे.

तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीला पोलिस उपअधिक्षक सुदर्शन मुंढे, पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर, पालिका मुख्याधिकारी संतोष लांडगे, प्रतिक खेडकर, वैभव शेवाळे आदींसह विविध गावचे पोलिस पाटील, विविध तरुण मंडळाचे कार्यकर्ते, मंडप, साऊंड सिस्टिम, डीजेधारक आदी उपस्थित होते.

गणेश विसर्जन व उत्सवासाठी शासकीय नियम, निर्बंध व सुचना याची माहिती देण्यासाठी व संवाद साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन केल्याचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सांगितले.

विसर्जन मिरवणुकीसाठी तरी प्रशासन काही नियम अटी शिथिल करून परवानगी देईल, अशी अपेक्षा तरुण कार्यकर्त्यांना होती. मात्र प्रशासनाने फक्त पारंपारिक वाद्य काही वेळ जागेवर वाजवण्यास परवानगी देत,

विसर्जन मिरवणुकीला संपूर्णतः बंदी असल्याचे जाहीर केले. कोरोनाचे संकट, संभाव्य तिसरी लाट पाहता होणारी गर्दी टाळण्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम व अटींचे पालन तरुण मंडळांनी करावे.

विसर्जन मिरवणूक टाळावी. मानाच्या गणपती समोर विसर्जनावेळी जागेवरच पारंपारिक वाद्य ठराविक वेळ वाजवावीत व संभाव्य गर्दी टाळावी व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आले.