अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आपल्याला माणसं जगविण्यासाठी मिशन मोडवर काम करायचे आहे.
कामचुकारपणामुळे कुणाचा जीव जायला नको. असे झाल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची अनुषंगाने तहसीलदार अमोल निकम यांनी यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात संगमनेर तालुक्यातील १४३ ग्रामपंचायतींचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांची बैठक घेतली.
या बैठकीत तहसीलदार निकम यांनी प्रत्येकाला सूचना देत, काही कामचुकारांना खडेबोल सुनावले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, तो रोखण्याकरिता संपूर्ण तालुक्यातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता तालुक्यात प्रत्येक गावात कोरोना ग्रामसुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीतील सदस्यांनी गावपातळीवर ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीच्या मोहिमेत चांगले काम करणे अपेक्षित आहे.
कोरोनाची व इतर आजारांची लक्षणे जाणवत असलेल्या नागरिकांची कोरोना टेस्ट करून घ्यावी. ज्यांची तपासणी झाली असेल, अशा नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करावे.
तसेच तालुक्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवावे, असे झाल्यास तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल, असेही तहसीलदार निकम म्हणाले.