अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-देशात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. पण ही लाट शक्यतो जुलैपर्यंत संपुष्टात येणार नाही, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक काळ तग धरून राहील, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. प्रख्यात विषाणूतज्ज्ञ शाहिद जमील यांनी मंगळवारी एका ऑनलाइन कार्यक्रमात बोलताना कोरोनाची दुसरी लाट इतक्यात ओसरणार नसल्याचे म्हटले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आपला सर्वोच्च बिंदू गाठला असल्याचे म्हणणे सद्य:स्थितीत घाईचे ठरेल. रुग्णांची संख्या भलेही रोडावली असेल. पण यानंतरची स्थिती देखील सोपी राहणार नाही. शक्यतो दुसरी लाट जुलैपर्यंत कायम राहू शकते.
अर्थात रुग्णांची संख्या कमी झाली असली तर दररोज आपल्याला मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांचा सामना करावा लागेल, असे जमील म्हणाले. वैज्ञानिकांनुसार कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या सहजपणे कमी होणार नाही.
पहिल्या लाटेवेळी रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे दिसून आले होते. परंतु यंदा आपल्याकडे कोरोनाग्रस्तांची संख्या खूप जास्त आहे. ९६ ते ९७ हजार रुग्णांऐवजी आजघडीला आपल्याकडे दररोज ४ लाखहून अधिक रुग्ण सापडत आहेत.
त्यामुळे हे संकट टळण्यासाठी जास्त वेळ लागेल, असे जमील म्हणाले. तसेच त्यांनी निवडणूक सभा, धार्मिक कार्यक्रम आणि मोठ-मोठ्या लग्नसोहळ्यामुळे कोरोना संकट वाढल्याचे म्हटले.
त्याचबरोबर जमील यांनी देशातील मृत्यूदराची आकडेवारी चुकीची असल्याचा दावा केला. यासाठी एखाद्या व्यक्ती, समूह किंवा देशाचे धोरण चुकीचे नाही तर आकडेवारी जमा करण्याची पद्घत कारणीभूत असल्याचे ते म्हणाले.