अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- शेतकऱ्यांना मदत करणे ही शासनाची भूमिका असावयास हवी, मात्र, महाविकास आघाडी सरकार हे सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचीच वीज खंडित करीत आहे. या सरकारमधील विविध पक्षांनी संपूर्ण कर्जमाफी व मोफत विजेचे आश्वासन दिले होते.
परंतु या शब्दाला जागणे दूरच उलट वीज रोहित्रे बंद करून कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महाविकास आघाडी सरकार हे फसवे सरकार आहे. सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे.
अशी घणाघाती टीका भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली. महावितरणने कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित करून गेली काही दिवसांपासून शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसुली सुरु केली आहे.
वीज तोडणी मोहिमेमुळे पाण्याअभावी शेती पिके जळून चालली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने तात्काळ आदेश देऊन कृषीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.
पाटील म्हणाले की, एकीकडे कोरोना, अतिवृष्टीमुळे शेती नुकसानीत जाऊन शेतकरीवर्ग आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. अशा अडचणीतही मोहिमेत आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी वीज बिलाची रक्कम भरलेली आहे.
त्यामुळे आता शेतकऱ्यांना आणखी त्रास न देता महाविकास आघाडी सरकारने तात्काळ निर्णय घेऊन शेतीचा वीजपुरवठा पूर्ववत करावा.
वीज तोडणी मोहिमेमुळे महाविकास आघाडी सरकार याबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याची दखल शासनाला घ्यावीच लागेल, असा इशाराही पाटील यांनी दिला.