‘त्या’ बँकेतील व्यवस्थापकाची आत्महत्या नाहीच, नातेवाईकांनी घेतली जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- नगर अर्बन बँकेतील भ्रष्टाचार लपविण्यासाठी प्रशासनातील अधिकार्‍यांनी टाकण्यात आलेल्या दबावापोटी नगर अर्बन बँकेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करुन शिंदे कुटुंबीय व चर्मकार विकास संघाच्या वतीने सदर मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

या मागणीसाठी शिंदे कुटुंबीय व संघटना पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित व जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी संगिता गोरक्षनाथ शिंदे, विशाल शिंदे, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रतिक शिंदे, प्रियांका शेंडे, किरण शेंडे, कारभारी शिंदे, कचरु शिंदे, दिपक शिंदे आदी उपस्थित होते.

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय 58, रा. भातकुडगाव ता.शेवगाव) व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांचा मृत्यू दि. 27 जुलै रोजी विषारी औषध घेऊन झाला. गोरक्षनाथ शिंदे अत्यंत प्रामाणिक अधिकारी म्हणून सर्वांना परिचित होते. तीन महिन्यापूर्वी त्यांची बँकेतून सेवानिवृत्ती झालेली होती. परंतु बँक प्रशासनाने त्यांना पुढील तीन महिने बढती दिली होती.

नगर अर्बन बँकेत मागील अनेक वर्षापासून विविध गैरप्रकार भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आली आहे. शेवगाव शाखेत सुद्धा खोट्या सोन्यावर अनेकांना संगनमताने कर्ज वितरित करण्याचे समोर आले आहे. यासंबंधी गोरक्षनाथ शिंदे यांनी 2018 मध्ये बँकेच्या गैरकारभार व भ्रष्टाचाराची सविस्तर माहिती पुराव्यासह बँक प्रशासनास दिली होती. परंतु बँक प्रशासनाने या गैरकारभार व भ्रष्टाचार प्रकरणी कुठलीही ठोस कारवाई केली नाही.

उलटपक्षी गोरक्षनाथ शिंदे यांना याविषयी गप्प राहण्याच्या सूचना बँक प्रशासनातील काही अधिकारी देत होते. पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड संदर्भात धमक्या देऊन भ्रष्टाचाराची वाच्यता न करता मुकाट्याने काम करण्यास सांगितले जात होते. शिंदे यांना मानसिक त्रास देऊन खच्चीकरण सुरू होते.

परंतु चुकीचे काम करणार नाही या भूमिकेवर ते ठाम होते. वेळोवेळी त्यांनी पोलिस प्रशासनास त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय व दबावाची माहिती दिली होती. परंतु पोलिस प्रशासनाकडून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. शिंदे सेवा निवृत्तीनंतरची पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटीची रक्कम मिळावी म्हणून बँक प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते. परंतु बँक प्रशासनाने चालढकल करून त्यांना अपमानित केले.

बँक प्रशासनाने शिंदे यांच्यावर दबाव टाकून जवळपास पंचवीस लाख बँकेत ठेवी म्हणून ठेवण्यास भाग पाडले. शिंदे यांच्याकडून बँकेच्या गैरकारभार व भ्रष्टाचार उघड होऊ नये व प्रशासनाच्या मनाप्रमाणे काम करावे म्हणून मोठा दबाव बँक प्रशासनातील काही अधिकारी यांनी टाकल्याचा आरोप शिंदे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला आहे. शिंदे यांना शेवटी बँक प्रशासनावर विश्‍वास राहिला नाही.

त्यांच्या स्वतःचे पैसे पण मिळणार नाही व बँक प्रशासन चुकीचे काम करायला लावेल अशी धारणा निर्माण झाली होती. तर बँक प्रशासन फसवून खोट्या प्रकरणात अडकवणार असल्याची खात्री त्यांना पटली होती. या सर्व दबावातून शिंदे यांनी स्वतःची स्वतःला संपविले. ही आत्महत्या नसून बँक प्रशासनाने वेळोवेळी शिंदे यांच्यावर अत्याचार करुन त्यांचा बळी घेतला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

या बँक प्रशासनात अशी एक टोळी तयार झालेले आहे. ती सर्व चुकीचे गैरप्रकाराचे काम करून मोठा भ्रष्टाचाराचा रॅकेट चालवत असल्याची शक्यता आहे. बँकेतील अनेक कर्मचारी, अधिकारी यांच्यावर चुकीचे काम करण्याचा दबाव आहे. यापुढे सुद्धा निरपराधांचा बळी जाण्याची शक्यता वाढली आहे.

यासाठी शिंदे यांच्या आत्महत्येची सीआयडीमार्फत चौकशी करून गोरक्षनाथ शिंदे व कुटुंबाला न्याय मिळावा, बँक प्रशासनातील गैरकारभार व भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा चर्मकार विकास संघाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24