अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- संचालक मंडळाच्या तीनपेक्षा जास्त बैठकांना गैरहजर राहिल्याने नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक केशव मगर आणि अण्णासाहेब शेलार यांना साखर सहसंचालकांनी नोटिसा बजावल्या आहेत.
नागवडे कारखान्याची निवडणूक कोविड संकटाने पुढे ढकलली असली, तरी तेथील राजकारण मात्र थांबत नाही. मगर व शेलार हे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकांना गैरजहर राहिल्याने त्यांना अपात्र ठरवावे, अशी तक्रार सभासद नितीन वाबळे व साहेबराव महारनोर यांनी केली होती.
त्यानुसार साखर सहसंचालकांनी या दोघांना नोटिसा बजावीत, येत्या सोमवारी म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. शेलार म्हणाले, ‘‘नागवडे हे कारखान्याचा कारभार खासगीसारखा चालवीत आहेत. आता हे गैरव्यवहाराचे सगळे पितळ उघड होऊ लागल्याने निवडणुकीत उत्तर द्यावे लागणार असल्याने,
आमची भीती वाटू लागली आहे. सहकारात संचालकांच्या मताला महत्त्व असते. येथे मात्र संचालकांना बोलण्याचासुद्धा अधिकार नसल्याने, या बैठका कागदावर असतात.’ मगर म्हणाले, ‘‘बापूंनंतर राजेंद्र नागवडे यांनी कारखान्यात कसा व किती गैरव्यवहार केला, याचा सगळा हिशेब आमच्याकडे आहे.
योग्य ठिकाणी त्याबाबत आम्ही पुरावे सादर केल्याने कारखान्याची चौकशीही लागली आहे. तसेच आपल्याला कोरोना झाला होता व ज्या ठिकाणी संचालकांची बैठक होती, तेथे गर्दी होत असल्याने आपण काही बैठकांना जाऊ शकलो नाही.
त्यातच संचालक मंडळाची मुदत संपल्याने कुठलेही धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याने, या बैठकांचे महत्त्वही नसते.’’ कोरोनाचे कारण दाखवून ऑनलाइन निविदा देत त्यात गैरव्यवहार करणाऱ्या कारखाना व्यवस्थापनाने संचालकांच्या बैठका ऑनलाइन का घेतल्या नाहीत, असा सवालही मगर यांनी केला.