अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- महापालिकेने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केलेल्या पाच जणांच्या निवडी बेकायदेशीर असल्याची याचिका नगरचे सामाजिक कार्यकर्ते शेख शाकीर यांनी दाखल केली होती.
आता याप्रकरणीखंडपीठाने राज्याच्या प्रधान सचिवांसह मनपाचे महापौर, आयुक्त, नवे स्वीकृत नगरसेवक असे मिळून नऊ जणांना नोटीसा काढल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, महापालिकेत पाच स्वीकृत नगरसेवक म्हणून संग्राम शेळके व मदन आढाव (दोन्ही शिवसेना), विपुल शेटिया व राजू कातोरे (दोन्ही राष्ट्रवादी) व रामदास आंधळे (भाजप) यांची नियुक्ती केली आहे.
पहिल्या महासभेने अपात्र ठरवलेल्या पाच सदस्यांना नंतरच्या महासभेने पात्र ठरवून त्यांची निवड केल्याने याविरोधात तसेच मनपा आयुक्तांवर शिस्तभंग कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रधान सचिवांकडे शेख यांनी तक्रार दाखल केली होती.
नियमबाह्य झालेल्या या नियुक्त्या रद्द करून दोषींवर कारवाई करण्याकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.
त्याची सुनावणी 15 जुन रोजी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे यांच्या समोर झाली. न्यायालयाने नऊ जणांना नोटीसा काढल्या आहेत.