अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य व अत्यंत संस्मरणीय असा क्षण असतो. असे म्हणतात की रेशीमगाठी या स्वर्गातूनच बांधल्या जातात.
मात्र कोरोनामुळे अनेकांच्या कमवते आईवडील अथवा वडीलांचा मृत्यू झाल्याने अनेक मुलींचे जमवलेले लग्न आता कसे होणार त्या घरातील सदस्यांसमोर यक्ष प्रक्ष पडलेला आहे.
मात्र लग्न जुळलेल्या त्या सर्व निराश्रीत लेकींसाठी आता शेवगाव येथील ‘ जागर ग्रुप ‘ने मदतीचा हात पुढे केला असून, हा ग्रुप नजीकच्या काळात त्या सर्व मुलींच्या रेशीम गाठी बांधणार आहे.
कोरोनाने समाजातील अनेक कुटुंबात होत्याचे नव्हते झाले. अनेक कर्ती माणसे डोळ्यादेखत गेली. यात अनेक गरीब कुटुंबात मुलींची लग्न जुळली होती.
काहींच्या तर तारखा देखील निश्चित झाल्याने घरात लगीनघाई सुरू होती. मात्र, कोरोनाने कोणाची आई तर, कोणाचे वडील हिरावून नेले अन् त्या कुटुंबासमोर काळोख पसरला.
परिणामी, गरिबीमुळे जुळलेली लग्न लांबणीवर पडली. मात्र त्या सर्व लेकींसाठी आता ‘जागर ग्रुप ‘सरसावला आहे.
त्यामुळे आता कोरोनामुळे अनेकांच्या कमवते आईवडील अथवा वडीलांचा मृत्यू झाल्याने अनेक मुलींचे रखडलेले लग्न पार पडतील.