अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहे. काही केल्या कोरोनाचा संसर्ग रोखला जात नसल्याने हतबल झालेल्या प्रशासनाने अखेर जनता कर्फ्यूचे नियम कडक करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाची अमलबजावणी रविवारी रात्रीपासून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आता जीवनावश्यक वस्तूंसाठीही केवळ चार तासांचीच मुभा देण्यात आली आहे. रविवारी रात्री १२ ते १ मे २०२१ रोजी सकाळी सातपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे.
या जनता कर्फ्यूला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. यापूर्वी १४ एप्रिल रोजी केलेल्या घोषणेप्रमाणे लॉकडाऊन सुरू झाला.
त्यामध्ये सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा दिवसभर सुरू आणि शनिवार व रविवार कडक लॉकडाऊन असे स्वरूप होते. त्यामध्ये सुधारित आदेशात बदल करून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी केवळ चार तासांचीच मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान नवीन नियमावलीनुसार आता जिल्ह्यात सर्वत्र सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत किराणा दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, भाजीपाला -फळे विक्री (फक्त द्वार वितरण), अंडी, मटन,
चिकन, मत्स्य, कृषी संबंधित सर्व सेवा, दुकाने, पशुखाद्य विक्री, पेट्रोलपंपावर खासगी वाहनांकरिता पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी गॅस विक्री सुरु राहणार आहे. दरम्यान या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.