अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- सध्या ग्रामीण भागातील जनता अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत वावरत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, शेतमालाचे कोसळते बाजारभाव अन् वाढती महागाई त्यात पर भर पडली ती भुरट्या चोरट्यांची. या सर्व परिस्थितीमुळे सध्या सर्वसामान्यांची अवस्था दुष्काळात तेरावा अशी झाली आहे.
अलीकडे भुरट्या चोरट्यांनी नुसता उच्छात मांडला आहे. दिवसा, रात्री अवेळी कधीही शेतकऱ्यांची कोणती वस्तू चोरतील याचा काहीच भरवसा राहीलेला नाही. असाच प्रकार जामखेड तालुक्यात घडला आहे. येथे एका शेतकऱ्याचे विहिरीवर बसवलेले सोलर पॅनलच अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत.
याबाबत सविस्तर असे की, यावर्षी चांगला पाऊस झाल्याने विहीरी, नदी, नाले तुडुंब भरले होते. परिणामी शेतकरी उत्पादन वृध्दीसाठी जीवाचे रान करत असताना परत खंडित वीज पुरवठा, रात्री अपरात्री पिकास पाणी देण्यासाठी जावे लागत असे, कंपनीने बिलासाठी वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा लावला होता. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी सौर पॅनल बसवले व या सर्व अडचणींवर मात केली.
मात्र या पॅनलवर देखील चोरट्यांची वाईट नजर पडली अन् ते देखील चोरी करण्याचा सपाटा लावला. जामखेड येथील बाबासाहेब डुचे यांच्या शेतातील सुमारे ५५ हजारांचे सोलर पॅनल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे. याबाबत डुचे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.