अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- समाजकारण आणि राजकारणात सत्तेचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे असते. राजकीय सत्ता एकाच ठिकाणी एकवटल्यास त्याचा लोकशाहीला अधिक धोका पोहोचतो.
म्हणूनच आगामी काळात तुम्ही साथ द्या, मी तालुक्याच्या राजकारणात जादू करून दाखवितो. असे सूचक वक्तव्य पारनेर तालुक्याचे माजी आमदार विजय औटी यांनी केले. तालुक्यातील भाळवणीत एका कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, सत्ता येते आणि जाते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेवून आलेले नसते. अगदी माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांनाही पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आपला जरी पराभव झाला असला तरी आपण दिलेला विकासकामांचा शब्द आजही पाळत आहे.
आगामी काळातही तालुक्याच्या राजकारणात जादू करण्याची धमक आपल्यात आहे मात्र, त्यासाठी आपली साथ हवी असे आवाहन त्यांनी केले. गेल्या दोन वर्षांपूर्वी आपल्या कार्यकाळात रस् त्याच्या डांबरीकरण करण्याचा दिलेला शब्द आपण पाळला असल्याचेही औटी म्हणाले.
दरम्यान यावेळी जिल्हा परिषदेचे बाधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते म्हणाले की, संपूर्ण तालुक्यात विकासाच्या विविध योजना मार्गी लावल्या आहेत. भाळवणी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा खोल्यांचे कामही आपण मार्गी लावले मात्र, त्याचे श्रेय दुसरेच असल्याची टीका त्यांनी केली.
तसेच औटी यांनी सुरू केलेले विकासाचे पर्व अखंडित सुरू असून विकासकामात कसलेही राजकारण न करण्याची औटी यांची शिकवण असल्याचेही ते म्हणाले.