नर्सरी चालकाने विकली बनावट पपईची रोपे ; बळीराजाचे लाखोंचे नुकसान

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील एका नर्सरी चालकाने शेवगाव तालुक्यातील घोटण व रावतळे, कुरुडगाव येथील शेतकऱ्यांना बनावट पपईची रोपे विकली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे यांनी प्रभारी तालुका कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड यांना दिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील एका नर्सरीतून रावतळे येथील अरुण रंगनाथ भराट, वसंत कारभारी मोटकर व भाऊराव मोटकर यांनी हजारो रोपे खरेदी केली होती.

परंतु, पपईची रोपे बनावट निघाल्याने अरुण भराट यांचे जवळपास २ लाख, वसंत मोटकर यांचे २.५० लाख तर ज्ञानेश्वर मोरकर यांचे ३ लाखापर्यंतचे नुकसान झालेले आहे.

पपईचे वाण खराब निघाल्याने सदरच्या पिकावर केलेला खर्च वाया गेला आहे. नर्सरी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेल्या नियमानुसार रोपांची काळजी घेऊनही रोपे जळून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

संबंधित नर्सरीकडे शेतकऱ्यांनी संपर्क केला असता, त्यांच्याकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, असे निवेदनात म्हंटले आहे. यामुळे अशा नर्सरी चालकावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office