आरक्षणासाठी आता ओबीसींचा गुरुवारी ‘आक्रोश’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- आरक्षणासाठी आता ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. गुरुवारी,१७ जून रोजी समता परिषदेने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ‘ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा’चं आयोजन केले आहे.

या मोर्चा ची माहिती देताना मंत्री भुजबळ म्हणाले, गुरुवारी आम्ही ओबीसींचा आक्रोश मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा केंद्र किंवा राज्य सरकारच्या विरोधात नाही. ओबीसी आरक्षणावर कोणीच काही बोलत नाही. या आरक्षणावर केंद्राने मार्ग काढावा, राज्याने मार्ग काढावा किंवा कोर्टाने मार्ग काढावा…

कोणीही मार्ग काढावा पण आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळेच हा मोर्चा काढला जात असल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं. राजकीय आरक्षण गेली पंचवीस वर्षे राज्यात लागू आहे. त्यामुळे साडे तीनशे लहान जातींना राजकारणात संधी मिळत होती.

शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिलं. त्यांनी मंडल आयोग लागू केला होता, असं ते म्हणाले. 4 मार्च रोजी ओबीसी आरक्षणावर कोर्टाचा निकाल आला. तेव्हा कोरोना सुरू होता. तरीही आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले.

पण कोर्टाने ऐकलं नाही. कोर्टाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 50 ते 60 हजार जागांवर परिणाम होणार आहे. हा केवळ एका राज्याचा प्रश्न नसून देशव्यापी प्रश्न आहे, असा दावा त्यांनी केला. मुंबई महापालिका ते जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत.

त्यात ओबीसी आरक्षण आहे की नाही? असा सवाल करतानाच ओबीसींचा डेटा गोळा करू, पण कोरोनाचा काळ आहे. घरोघरी जाऊन सर्व्हे कसा करणार?, असा सवाल त्यांनी केला. भाजपने मोर्चा काढला. टीका केली ठिक आहे. भाजप या प्रश्नावर आक्रमक आहे हे पुरेसे आहे.

पण समता परिषद अध्यक्ष म्हणून माझ्यावरही काही जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही उद्या आंदोलन करत आहोत. पण हे आंदोलन केंद्र किंवा राज्याच्या विरोधात नाही. आमचा आक्रोश आम्ही मांडणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

नाशिकमध्ये रास्तारोको दरम्यान, उद्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ओबीसी आरक्षणासाठी रास्तारोको करण्यात येणार आहे. उद्या सकाळी नाशिकच्या द्वारका परिसरातून रास्ता रोकोला सुरुवात होईल, असं समता परिषदचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी सांगितलं.

छगन भुजबळ आणि समीर भुजबळ न्यायालयीन लढाई लढतील, तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत, असं खैरे यांनी स्पष्ट केलं.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24