Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एका महाविद्यालयातील प्राध्यापकास जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करत हा प्रकार घडला आहे.
प्रा.अतुल चौरपगार असे या प्राध्यापकाचे नाव आहे. यासंदर्भात त्यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी सात तरुणांविरोधात जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला.
चौरपगार यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, २५ जानेवारीला कॉलेजमधून घरी जात असताना आपणाला एक कॉल आला व ‘तुम्ही माझ्या बहिणीला कॉलेजमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात श्रीरामाच्या गाण्यावर डान्स का करू देत नाही? अशी विचारणा केली. दुसऱ्या दिवशी २६ जानेवारीला काही तरुण कॉलेजमध्ये आले. त्यांनी प्राचार्याच्या केबिनमध्ये मला बोलावून घेत जाब विचारला, आपण सांस्कृतिक समितीवर नाही.
त्यामुळे विरोध करण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण दिल्यानंतरही बजरंग दलाच्या लोकांनी मोबाइलमधील एक स्क्रीनशॉट दाखवत आमच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. जातिवाचक शिवीगाळ करून लेखी माफीनामा द्या व तुमच्या व्हॉट्सअॅपला स्टेटस ठेवा, असे सांगितले.
महाविद्यालयाचे नाव खराब होऊ नये यासाठी माफीनामा लिहून प्रकरण मिटवा असा आग्रह झाल्याने मी माफीनामा लिहिला. पण त्यावर जय श्रीराम असे लिहावे असा आग्रह करण्यात आला. मात्र मी तसे केले नाही. माफीनामा स्टेटसला ठेवल्यानंतरही सचिन राजळे, दत्तात्रय दारकुंडे यांनी मला जातीवाचक शिवीगाळ करत केबिनच्या काचा फोडल्या.
पुढे मी कॉलेजच्या गेटवर जाऊन माफी मागितल्यास पुन्हा त्रास होणार नाही असा प्रस्ताव समोर ठेवला. त्यावर विश्वास ठेऊन मी गेटवर जाऊन तेथे जमलेल्या लोकांची माफी मागितली.
तरीही दत्तात्रेय बापू दारकुंडे, सचिन बाळासाहेब राजळे, शुभम अर्जुन नेव्हल, अशोक कुटे, अविनाश सुखदेव काळे, अभिषेक अरुण कचरे, दत्तात्रेय राजेंद्र कचरे यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. प्राचार्य व इतर कर्मचा-यांनी आपली तेथून सुटका केली, असे चौरपगार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील करीत आहेत.