अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- सध्या चोरट्यांना चोरी करताना दिवस असो किंवा रात्र असो त्यांना काहीच फरक पडत नसल्याचे भयानक वास्तव आहे.
कर्जत तालुक्यातील शितपूर या गावात भरदुपारी घरात आराम करत असलेल्या वृध्दाला घरात घुसून तीन दारेाडेखोरांनी मारहाण करत घरातील सामानाची उचकापाक करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे, रोख रक्कम व मोबाईल असा २ लाख २० हजार रूपये किंमतीचा ऐवज लुटून नेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कर्जत तालुक्यातील शितपूर येथील वृध्द शेतकरी रामचंद्र बाबासाहेब गायकवाड हे घरात एकटेच असताना एका मोटारसायकलवर ३ दरोडेखोर आले.
त्यातील दोघे जण घरात घुसले व एक जण घराबाहेर टेहळणी करत थांबला. घरात घुसलेल्या दोघांपैकी एकाने गायकवाड यांच्या जवळ जावून त्यांच्या डोक्यात कटावणीचा घाव घातला.
यावेळी त्यांनी हात मध्ये घातल्याने दोन्ही हातांवर मोठी जखम झाली. त्यानंतर आरडाओरड केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीने घरातील कपाटात ठेवलेले दागिणे व रोख रक्कम तसेच १ मोबाईल काढून घेतला.
त्यानंतर लुटीतील ऐवज घेवून दोघे घराबाहेर गेले व बाहेरील व्यक्तीसह मोटारसायकलवर बसून पसार झाले. या प्रकरणी रामचंद्र गायकवाड यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी अज्ञात ३ दरोडेखोरांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.