अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- सध्या अनेकवेळा किरकोळ कारणावरून देखील एकमेकांचा जीव घेण्याचा अत्यंत गंभीर प्रकार घडत आहे.असा प्रकार नगरमध्ये देखील घडला आहे. केवळ घासाच्या पेंढ्या उचलून नेल्याचा जाब विचारल्यामुळे चौघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.
या प्रकरणी पाच ते सहा जणांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निसार बडेसाब सय्यद (रा.बाराइमाम कोठला) यांनी फिर्याद दिली आहे.
सय्यद यांचा घासविक्रीचा व्यवसाय असून, सकाळी ते घासगल्ली येथे त्यांचा पुतण्या दिशान याच्यासह व्यवसाय करत होते. यावेळी जाफर उमर शेख याच्या मुलाने घासविक्रीसाठी ठेवलेल्या पेंढ्या उचलून एका दुसऱ्या गाळ्यात नेऊन टाकल्या.
सय्यद यांनी त्याला जाब विचारल्यानंतर त्याने सय्यद यांच्याशी वाद घातला. काही वेळात जाफर उमर शेख याने तेथे येवून सय्यद याच्यावर कोयत्याने वार केला. यात सय्यद यांच्या हाताला गंभीर जखम झाली.
जाफर शेख व त्याच्या मुलाने व इतर साथीदारांना पुन्हा कोयता व चॉपरने मारहाण करण्याचा प्रयत्न करत असताना सय्यद यांचा पुतण्या दिशान वाचविण्यासाठी आला. त्यालाही मारहाण झाली.
या दोघांना सोडविण्यासाठी आलेल्या सय्यद यांचा भाऊ व पुतण्यालाही त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी तोफखाना पोलिसात जाफर उमर शेख, त्याचा मुलगा ,
त्याच्या दोन बहिणी, शेख याचा दाजी जमालुद्दीन, भाचा मुजम्मील (सर्व रा.कोठला, नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.