अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- अद्याप कोरोनाच्या संकटातून नागरिक पुरते सावरत नाहीत तोच म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराने आता धुमाकूळ घातला आहे .
आतापर्यंत बोटावर मोजण्याइतपत असलेली रुग्ण संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे . औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु आता म्युकर मायकोसिसचा घट्ट विळखा पाहता औरंगाबादमधील नागरिकांच्या पुन्हा चिंता वाढल्या आहेत.
त्यात भरीस भर म्हणजे म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर उचपार करणाऱ्यासाठी लागणारी इंजेक्शनची वाणवा भासू लागली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे . या शहरात म्युकर मायकोसिसचा विस्फोट झाला असून,
म्युकर मायकोसिसने आतापर्यंत ५३जणांचे बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर म्युकर मायकोसिसचा रुग्णांची संख्याही तब्बल पावणे सहाशेवर जाऊन पोहोचली आहे. खाजगी रुग्णालयांकडून आतापर्यंत रुग्ण आणि मृतांच्या आकड्यांची लपवाछपवी सुरु होती.
मात्र आरोग्य यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार म्युकरमायकोसिसने ५३ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे . औरंगाबादमध्ये म्युकर मायकोसिसचे ३९९ रुग्ण असल्याची माहिती गुरुवारी दिली होती. परंतु एकाच दिवसात तब्बल १७७ रुग्णांची भर पडली आहे.
ही संख्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ५७६ वर गेली. आता ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच म्युकरमायकोसिसचा विस्फोट पाहता आरोग्य यंत्रणा हादरुन गेली आहे. यात अनेक रुग्णालयांनी म्युकरमायकोसिसची खरी रुग्णसंख्या लपवली होती.
मात्र आता म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे आणि मृत्यूचे प्रमाण पाहता आरोग्य विभागाला मोठा धक्का बसला असून, म्युकरमायकोसिसचे आणखी बरेच रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे.