अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- दिवसभराचे शेतातील काम उरकून घरी जात असलेल्या एका शेतमजूरावर बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी बिबट्याने या शेतमजूरास अक्षरशःओढत उसाच्या शेतात नेऊन ठार केले. यामुळे एकच खळबळ उडाली असून परिसरात या घटनेने घबराट पसरली आहे.
संतोष कारभारी गावडे (वय ४५) असे या हल्ल्यात मृत झालेल्या शेतमजूराचे नाव आहे. ही घटना अकोले तालुक्यातील धुमाळवाडी येथील झोळेकर वस्तीजवळ रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर असे की, अकोले तालुक्यातील धुमाळवाडी, धामणगाव आवारी आदी गावांत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे शेळ्या, मेढ्यांवर हल्ले सुरू आहेत.
त्यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाकडे अनेकदा पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. अशातच काल मध्यरात्री धुमाळवाडी शिवारातील झोळेकर वस्तीजवळ धामणगाव आवारी रोडलगत शेतात संतोष कारभारी गावंडे (वय ४५) हा शेतमजूर काम उरकून घरी चालला होता.
यावेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला ओढत उसाच्या शेतात नेले व त्याला ठार केले. सकाळी या घटनेची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर पोलीस पाटील प्रणाली प्रशांत धुमाळ यांनी पोलीस व वनविभागाला कळविले.
त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. नंतर वनकर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला.