अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- सध्या राज्यावर संकटांची मालिका सुरु असून ती काही थांबण्याचे नाव घेत नाही. कोरोना नंतर आता पावसाने राज्यात धुमाकुळ घातला आहे. यामुळे अनेक भागातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. अनेक भागांत दरड कोसळून शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. तर पुरामुळे वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. यात कोकण रेल्वे मार्गावरही दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.
गोव्यामध्ये मंगळूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका रेल्वेवर मोठी दरड कोसळली आहे. यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली ही रेल्वे गेली अनेक तास अडकून पडली आहे. कर्नाटकमधील मंगळूरहून मुंबईकडे येणारी गाडी अपघातग्रस्त झाली आहे .
या घटनेचा एक व्हिडिओ आता समोर येत आहे. ही रेल्वे दुधसागर- सोनोलिम विभागादरम्यान रेल्वे रुळावरून खाली उतरली आहे. ०११३४ मंगळूर जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस ही रेल्वे अपघातग्रस्त झाली आहे.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणताही जीवितहानी घडलेली नाही. मात्र याचा मोठा फटका आता कोकण रेल्वे मार्गाला बसला आहे. विशेष बाब म्हणजे चिपळूणमधील पुरामुळे या रेल्वे मार्गात बदल करुन ती मडगाव-मिरजमार्गे वळवण्यात आली होती.
दुधसागर आणि सोनोलिम स्टेशनांदरम्यान आणि करंजोल व दुधसागर स्टेशनदरम्यान दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागादरम्यानच्या घाट विभागात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मोठा मातीचा मोठा ढिगारा रुळावर कोसळला.