अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- सध्या चोरटे चोरी करण्यासाठी कोणत्याही थराला जात आहेत. यात एका लष्करी जवानास या चोरट्यांनी दिड लाखाला चुना लावला आहे.
बंद असलेल्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागीने असा १ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन या भामट्यांनी लंपास केला आहे.
ही घटना पारनेर शहरातील नागेश्वर कॉम्प्लेक्समध्ये घडली. याबाबत दीपक बबन ठाणगे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ठाणगे हे लष्करी जवान असून ते सुट्टीवर गावी आलेले होते.
दरम्यान रविवारी ते कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले दागीने व रोख रक्कम चोरुन नेली.
त्याचबरोबर चोरट्यांनी त्यांच्या शेजारील मधुकर गिरी यांचे देखील बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सामानाची उचका-पाचक केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.