अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- जवळपास महिनाभरापासून पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात पाठ फिरवली आहे. त्यामुळे या भागातील मूग, सोयाबीन, बाजरीसह इतर पिके धोक्यात आली आहेत.
पाथर्डी तालुक्यातील काही परिसरात पावसाने ओढ दिल्याने या भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, पुढील पंधरा दिवस पुरेल एवढाच चारा शेतकर्यांकडे आता शिल्लक आहे. यावर्षीचा पावसाळा सुरू झाल्यापासून पाथर्डी तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत आहे कुठेही समाधानकारक पाऊस तालुक्यात झाला नाही.
असे असताना देखील अधून मधून झालेल्या भीज पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणी केली, परंतु त्यानंतर मात्र एक महिना उलटला अद्यापही मिरी करंजी चिचोंडी या भागात कुठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून शेतकऱ्यांपुढे चाराटंचाईचा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे कोल्हापूर सांगली रत्नागिरी या भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे मोठे नुकसान झाले तर इकडे मात्र पाऊसा पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिक जळून गेली आहेत.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णपणे आता अस्वस्थ झाला असून कोरोना महामारी बरोबरच पावसाचे देखील मोठे संकट आता शेतकऱ्यावर रोढावले आहे. काही गावात पाणीटंचाई देखील काही प्रमाणात निर्माण होऊ लागली आहे. मोठा पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.