अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- सध्या एकीकडे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे तर दुसरीकडे संचारबंदीमुळे किराणा, पशुखाद्याच्या किमती मोठ्या वाढत प्रमाणात वाढत आहेत.
मात्र गाईच्या दुधाचा भाव घसरल्याने एक लिटर बाटली बंद पाण्याच्या दरात दूध विकण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे. कोरोनाची दुसरी लाट, त्यामागून आलेली टाळेबंदी याचा फायदा उचलत बाजारात मागणी नसल्याचा कांगावा करत दुधाचे दर कमी केले आहेत.
मात्र, प्रत्यक्षात दुधाला प्रतिलिटर उत्पादन खर्चा एवढा देखील दर सध्या मिळत नाही. जनावरांच्या खुराकाच्या वाढलेल्या किमती व चाऱ्याचा विचार केला असता शेतकऱ्यांना एक लिटर दूध उत्पादनासाठी तब्बल २५ ते २६ रुपयांपर्यंत खर्च येतो.
मात्र, हेच दूध सध्या अवघ्या २० ते २३ रुपये दराने विकले जात असल्याने, शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे जनावरांना लागणारा खुराकही लॉकडाउनमुळे वेळेवर मिळत नसल्याने, दुधामध्ये मोठ्या प्रमाणात घट येत आहे.
शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे तसेच पशुखाद्यासह कडब्याच्या दरात वाढ झाल्याने आधीच संकटात सापडलेल्या दूध उत्पादकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
प्रत्यक्षात राज्य सरकारने दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मिती व विक्रीवर कोणतेही निर्बंध लादले नाहीत. मात्र, प्राप्त परिस्थितीचा फायदा उचलत दूध संस्था दूध उत्पादकांची पिळवणूक करत आहेत.