अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान होत असलेल्या उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नगरकरांच्या वतीने उड्डाणपूलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव देण्यात आले. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उड्डणपूलाच्या नामकरण फलकाचे अनावरण करुन नारळ फोडण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, नगरसेवक प्रकाश भागानगरे, युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, शहराध्यक्ष वैभव ढाकणे, निलेश बांगरे, संतोष ढाकणे, भरत गारूडकर, अमोल कांडेकर, राजेंद्र भालेराव, निलेश इंगळे, वैभव म्हस्के,
शहानवाझ शेख, सुफियान शेख, वसिम शेख, मिजान कुरेशी, संतोष हजारे, अजय गुंड पाटील, जाकिर शेख, हाफिज शेख, शाहरुख शेख आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत, नगरकरांच्या वतीने उड्डाणपूलाचे नामकरण करुन उड्डाणपूलाच्या खांबांना नामकरणाचे भिंतीपत्रके चिकटविण्यात आले.
यापुर्वी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलच्या वतीने सदर उड्डाणपूलास शिवाजी महाराजांचे नांव देण्याची मागणी करुन प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र प्रशासनाने सदर मागणीकडे दुर्लक्ष केल्याने उड्डाणपूलाचे जाहीर नामकरण करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते म्हणाले की, उड्डाणपूलाला शिवाजी महाराजांचे नांव देण्याची संबंधित विभागाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
या प्रस्तावाला सदर विभागाने उत्तर न दिल्याने. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पूलाचे नामकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवाजी महाराजांचा नांव उड्डाणपूलास देण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर त्याला विनाविलंब मंजूरी देण्याची गरज होती. मात्र नगरकरांच्या वतीने या उड्डाणपूलाचे नामकरण करण्यात आले असून, संबंधित खात्याने देखील हे नामकरण अधिकृत घोषित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
साहेबान जहागीरदार म्हणाले की, शहरात उड्डाणपूलाच्या रुपाने मोठी वास्तू साकारली जात आहे. या वास्तूला छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव देण्याची अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने मागणी करण्यात आली होती. शासनाने याची दखल घेतली नाही. शिवाजी महाराजांचे नांव उड्डाणपूलास द्यावे, ही नगरकरांची इच्छा राष्ट्रवादीने पुर्ण केली आहे.
शिवाजी महाराजांच्या पुर्वजांचा इतिहास या मातीशी जोडला गेलेला आहे. शिवाजी महाराजांचे आजोबा शहा शरीफ बाबांचे भक्त होते. तसेच शहाजी व शरीफजी राजे यांचे देखील या शहराशी वेगळे नाते होते. शिवाजी महाराजांनी जाती, धर्मापलीकडे जाऊन स्वराज्याची निर्मिती केली. त्यांचे नांव उड्डाणपूलास देणे हे प्रत्येक नागरिकांची इच्छा होती, असे त्यांनी सांगितले.