मोदींच्या अश्रुंवर रोहित पवार म्हणाले… पक्षीय मतभेद असावेत पण मनभेद नसावेत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-राज्यसभेत मंगळवारी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार सदस्यांना निरोप देण्यात आला. यावेळी गुलाम नबी आझाद यांच्याविषयी बोलताना पंतप्रधान मोदी भावुक झाले होते.

सर्वांबद्दलच मोदी बोलले मात्र, आझाद यांच्याबद्दल बोलताना, त्यांच्यासंबंधी जुन्या आठवणींना उजाळा देताना मोदींच्या डोळ्यांतून अश्रूही येताना दिसले. काही क्षण त्यांचा आवाजही फुटत नव्हता.

हे पाहून सभागृहात शांतता पसरली होती. मोदींच्या या ‘अश्रूं’वर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. नेहमी केंद्र सरकारच्या आणि मोदी यांच्याही धोरणांवर टीकास्त्र सोडणारे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोदींच्या या कृतीवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

आमदार पवार यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया नोंदविली आहे. मोदींचे जाहीर कौतुकच पवार यांनी केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘राज्यसभेत विरोधी पक्षनेत्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झालेले पाहायला मिळाले.

पक्षीय मतभेद असावेत पण मनभेद नसावेत, या भारतीय राजकारणातील आपल्या पूर्वसूरींनी घालून दिलेल्या मार्गावरुन मोदीजींना चालताना पाहून आनंद वाटला.’

असे म्हणत पवार यांनी मोदींचा भावुक फोटोही सोबत जोडला आहे. काँग्रेस नेत्यांचे मोदींकडून असे कौतुक होत असताना अनेक राजकीय नेते आणि राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या.

त्यावेळी पवार यांची ही कौतुकाची प्रतिक्रिया आली. विशेष म्हणजे मोदींनी त्यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही नामोल्लेख करत कौतुक केले होते.

अहमदनगर लाईव्ह 24