अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- गेल्या ७० दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची धूळधाण झाली आहे. शेतकरी राजा आशाळभूत नजरेने आकाशाकडे पाहतो आहे. गोदावरी नदी काठोकाठ भरून वाहते आहे, पण गोदावरी कालवे मात्र कोरडेठाक पडले असून पाटपाणी आवर्तनाचा खेळखंडोबा झाला आहे.
तेव्हा पाटबंधारे खात्याने तातडीने गोदावरी कालव्यांना खरिपाचे आवर्तन सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपाचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
त्या म्हणाल्या की, २५ हजार एकर शेत शिवार गोदावरी कालव्याच्या माध्यमातून फुलत असतो. उर्ध्व गोदावरी खोऱ्यात घोटी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर भागात पर्जन्यमान चांगले झाल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. दारणा, गंगापूर धरने 75 टक्के च्या पुढे भरले आहेत.
कोपरगाव व गोदावरी कालवे लाभक्षेत्रात पावसाने ओढ दिली आहे. शेतकऱ्यावर सुरुवातीलाच दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्याने पदरमोड करत पत्नीचे दागिने गहाण ठेवत कर्ज काढून खरिपाची पिके पुन्हा कशीबशी घेतली पण पाऊस नसल्याने ती पाण्याअभावी जळून चालली आहे.
पिकांना पाणी मिळाले नाही तर शेतकऱ्यांपुढे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. गोदावरी कालव्यांना खरीपाचे आवर्तन सोडावे म्हणून आम्ही सातत्याने मागणी करत आहोत. शेतकऱ्यांचा दबावही दर्शन दिवसेदिवस वाढत आहे. समन्यायी पाणीवाटपiची भीती दाखवून जायकवाडीचे पाण्याची काळजी घेत,
गोदावरी कालवे लाभधारक शेतकऱ्यांच्या बोकांडी प्रत्येक वेळी ही भीती दाखवली जाते. त्या नावाखाली आतापर्यंत पाच टीएमसी पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आलेले आहे.
गोदावरी कालव्यांना अवघ्या दीड टीएमसी पाण्याची गरज असताना पाटबंधारे खात्याने व संबंधित यंत्रणेने त्याचा खेळखंडोबा केला आहे. कडेवरचे सांभाळण्याच्या नादात गोदावरी कालवे लाभधारक शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे.
तेव्हा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी आता शेतकऱ्यांचा अंत न पाहता तातडीने गोदावरी कालव्यांना खरीप पिकाचे पाण्याचे आवर्तन सोडून दिलासा द्यावा अन्यथा हा शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरून संघर्ष करेल असा इशारा सौ. स्नेहलता कोल्हे यांनी शेवटी दिला आहे.
ज्यांच्याकडे गोदावरी कालवे पाटपाण्याची जबाबदारी आहे ते मात्र नगरपालिकेच्या आरोप-प्रत्यारोप गर्क आहेत, शेतकऱ्यांच्या खरीप पिकांची वाताहात झाली, तरी त्यांना त्याचे सोयरसुतक नाही, असे सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या.