file photo

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळा, निळवंडे, भंडारदरा धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. एकीकडे सुकाळ असताना जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात मात्र परिस्थिती या विरुद्ध दिसून येत आहे.

अर्धा पावसाळा होऊनही श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जलाशयात मात्र अद्यापही ठणठणाट आहे. कुकडी कालवा एक महिना वाहन असतानाही विसापूर प्रकल्पात पाणी सोडण्यात आले नाही.

गेल्या वर्षी कुकडीचे ओव्हरफ्लोच्या पाण्याने विसापूर ऑगस्ट महिन्यात चाळीस टक्के भरले होते. यावर्षी या काळात विसापुरात पाण्याचा ठणठणाट पाहायला मिळत आहे.

मागील महिन्यात कुकडीचे ‘ओव्हरफ्लो’चे पाणी जवळपास एक महिना चालू होते. परंतु, या काळात ना श्रीगोंदा तालुक्यात मिळाले, ना विसापूर प्रकल्पाला.

मागील वर्षी या काळात विसापूर ओव्हरफ्लो होऊन हंगा नदी दुथडी भरून वाहत होती. आता मात्र ९१८ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या विसापूर प्रकल्पालामध्ये ८५ घनफूट म्हणजे जवळपास दहा टक्के पाणीसाठा आहे.

यामुळे येत्या काळात संबंधित ठिकाणचा पाणीप्रश्न गंभीर बनणार आहे, अशी परिस्थिती दिसून येत आहे.