अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- राज्यात सध्या पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बीड जिल्ह्य़ातील परळी वैजनाथ येथील पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात भाजपाने थेट शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं असून राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या.
भाजपनं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण लावून धरलं असून, आता संजय राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. महाविकास आघाडीतील इतर नेतेही याप्रकरणी भाजपाला प्रत्युत्तर देत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अहमदनगर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू आहे. अशा अनेक वेगवेगळ्या चर्चा होतात, मात्र त्या मुलीला न्याय हा नक्की मिळेल, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केलाय.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड ( यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राठोड यांच्या राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालीय.