अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील शेतकरी पोपट लक्ष्मण खपके यांचा अंमळनेर शिवारातील गट नंबर ९६/१/२ मधील एक एकर ऊस जळून खाक झाला.
खपके यांच्या उसाच्या शेतावरून गेलेल्या महावितरणच्या विजेच्या तारांचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ऊस जळाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
भर दुपारी धुराचे प्रचंड लोट दिसू लागल्याने परीसरातील लोकांनी जळणाऱ्या उसाकडे धाव घेतली. आगीचा वेग जोरात असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य होत नव्हते.
त्यामुळे शेतकरी खपके यांनी तात्काळ अग्निशमन दलास पाचारण केल्याने आग आटोक्यात आली. याकामी स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलास सहकार्य केले.
त्यामुळे आग लवकर आटोक्यात येण्यास मदत झाली. कोरोनाबरोबरच नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट या अस्मानी संकटांबरोबरच हे सुलतानी संकट कोसळल्याने शेतकरी पोपट खपके हताश झाले आहेत.
महावितरणच्या देवळाली प्रवरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचांसमक्ष पंचनामा केला. महावितरणकडून परिसरातील वीजवाहक तारा व खांबांची योग्य देखभाल व्हावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
विजेच्या तारांमुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे खपके यांचे मोठे नुकसान झाले असून शासनस्तरावरून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी पोपट खपके,
दवणगावचे सरपंच मेजर भाऊसाहेब खपके, उपसरपंच संदिप जऱ्हाड, पोलिस पाटील नंदकिशोर खपके, ग्रामपंचायत सदस्य जॉन भोसले, संजय होन, गोकुळ साळुंके आदी शेतकऱ्यांनी केली आहे.