एक दिवस अजित पवार हेच सरकार पाडतील…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- अजित पवारांविषयी मला आदर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणातही आहेत. आता ते म्हणत आहेत की, ‘कोणीही मायचा लाल सरकार पाडू शकत नाही.’ त्यावर मी असंच म्हणेन की, कोण आहे तो मायचा लाल, मला तर दिसतेय ही अजितदादांची चाल.

त्यामुळे एक दिवस अजित पवार हेच सरकार पाडतील, अशी प्रतिक्रिया आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राज्यातील सत्तांतरांबद्दलच्या शक्यताही व्यक्त केल्या.

ते म्हणाले, अजित पवार शपथ घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांसोबत गेले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना असं वाटलं होतं की, अनेक आमदार त्यांच्यासोबत आले आहेत. अजित पवारांनीही फडणवीसांसोबत जाताना आमदार बरोबर आहेत की नाही हे बघायला हवं होतं.

ते न करताच ते शपथविधीला गेले. पण पु्न्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी होऊ शकतो. असा विश्वास मला आहे. पुढे काय होतं ते बघू. या सरकारमध्ये ताळमेळ नाही. उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत, त्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली.

चांगली गोष्ट आहे. एकत्र न येणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन बनवलेलं सरकार आहे. त्यामुळे या तिघांमध्ये अजिबात ताळमेळ नाही. त्यामुळे हे सरकार कधी पडेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे ‘महाविकास आघाडी सरकार गो’ हीच माझी घोषणा आहे, असे आठवले म्हणाले

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे पुन्हा शपथ घेतील असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न आठवलेंना विचारण्यात आला. त्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, “हे तीन पक्ष एकत्र येतील, असं मला वाटलं नव्हतं, पण ते एकत्र आले.

त्यामुळे हे दोघे (देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) एकत्र येणार नाहीत, असं जरी अनेकांना वाटत असलं, तरी सुद्धा हे दोघे कधीतरी एकत्र येऊ शकतात. शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. त्यांच्यासोबत माझे मित्रत्वाचे संबंध आहेत.

ते आजारी असताना मी त्यांची भेट घेतली होती. त्यांनी भविष्याच्या दृष्टीने ‘एनडीए’मध्ये यावं, अशी भूमिकाही मी मांडलेली आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे दोन नेते एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या विकासाला फायदा होईल, असेही आठवले म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24