अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शालेय पट संख्या आणि गुणवत्तावाढीसाठी तसेच स्पर्धेच्या युगात या शाळा टिकवण्यासाठी ‘एक दिवस शाळेसाठी’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राज्याच्या शिक्षण विभागाने राबवण्याचे ठरवले आहे.
राज्यातील खाजगी शाळांमधील वाढती विद्यार्थी संख्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गळती रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. यात सरकारी शाळा टिकवण्याच्या कामात केवळ शिक्षकच नव्हे तर शासकीय अधिकाऱ्यांचाही सहभाग घेतला जाणार आहे.
याबाबतीत शासनाने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील शाळांच्या संख्येनुसार जिल्हाधिकारी, तहसिलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी आणि जिल्हा पातळीवरील शासकीय वर्ग एक आणि दोनचे अधिकारी यांनी एका वर्षात किमान तीन शाळांना भेटी देणे आवश्यक आहे.
या उपक्रमात शालेय शिक्षण विभागासह पंचायत राज, ग्रामविकास, महसूल विभाग यांचाही सहभाग असेल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.