अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- मुलाला भूतबाधा झाल्याचे सांगून त्याच्या मातापित्यांकडून पैसे उकळणाऱ्या तसेच जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी महाराजाला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली.
राज साहेबराज मंदी ऊर्फगिरी महाराज (वय २५, रा. पंचेदार फाटा, गाव पंचेदार, ता. काटोल, जि. नागपूर) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील दुसऱ्या पसार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. गिट्टीखदान हद्दीतील गौतमनगर, भिवसनखोरी येथे राहणाऱ्या माला सुरेश शर्मा (६२) या २५ जानेवारीला दुपारच्या सुमारास घरी बसल्या होत्या.
आरोपी राज हा डोक्याला लावायचे तेल विकण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरी आला. शर्मा यांच्या मुलाला पाहून त्याने त्याला भूतबाधा झाली असून पूजा करून औषध घ्यावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर तो तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याचवेळी आरोपी दुसरा आरोपी रंजित (वय ३५, रा. जामगळ, जि. नागपूर) यास सोबत घेऊन त्यांच्या घरी आला.
दोघांनी शर्मा यांना भूतबाधा, पूजा आणि औषधीसाठी चार लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले आणि घरातील देवस्थानासमोर खड्डा खोदून पूजा करावी लागेल, अशी भीती मनात घालून त्यांच्याकडून एक लाख रुपये घेतले. बाकीचे पैसे नंतर देण्यास सांगून आरोपी एक लाख रुपये घेऊन पसार झाले.
त्यानंतर दोघांनी शर्मा यांना वारंवार फोन करून घरातील व्यक्तींना जादूटोणा करून जिवानिशी ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ४२०, ५०६ (ब), ३४ भादंवि सहकलम ३ महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.