हवामान विभागाची एक चूक बळीराजाला आर्थिक भारी पडणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतीचा मुख्य स्रोत हा पाऊस बनू लागल्याने मोठी पंचाईत निर्माण झाली आहे.

यातच पावसाने जिल्ह्यावरील आपली नजरच फिरवली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पेरणीसाठी पावसाची वाट पाहत बसलेला बळीराजा आता मात्र चिंताग्रस्त झाला आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजे मृग नक्षत्रातच जिल्ह्यात दमदार पाऊस झाला.

त्यानंतर हवामान खात्यानेही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या. पिकांची उगवणही चांगली झाली. मात्र त्यानंतर मागील जवळपास दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली.

त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान दरवर्षीप्रमाणे हवामान खात्याचा अंदाज यंदाही चुकल्याने जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील खरीप पिके संकटात सापडली आहेत. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

आगामी आठवडाभर पाऊस न झाल्यास अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. जिल्ह्यात खरीप हंगामात बाजरी, तूर, कापूस, मूग, उडीद, सोयाबीन अशी पिके प्रामुख्याने घेतली जातात.

यंदाही शेतकऱ्यांनी याच पिकांना प्राधान्य दिले. उडदाची तर उच्चांकी पेरणी झाली. मात्र आता शेतकऱ्यांची नजर पावसावर खिळून आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24