अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- अनैतिक संबंधास अडथळा ठरल्याच्या कारणावरुन चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी तालुक्यातील मेंढवण येथील एका जणाला येथील जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मेंढवण येथील चंद्रकांत सोपान बढे हा अनैतिक संबंधात अडथळा ठरतो, या कारणावरुन समीर चॉँदभाई पठाण, अकबर चॉँदभाई पठाण, शुभांगी चंद्रकांत बढे (सर्व रा.मेंढवण, ता.संगमनेर) यांनी चंद्रकांत बढे व त्याचा भाऊ सोमनाथ बढे यांना शिवीगाळ, दमदाटी केली. समीर पठाण याने सोमनाथ बढे यास चाकूने भोसकले होते.
यात सोमनाथ बढे याचा मृत्यू झाला होता. या खटल्याची सुनावणी अतिरीक्त व सत्र न्यायाधीश भोसले यांच्यासमोर झाली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. यात मयताचा भाऊ, वैद्यकीय अधिकारी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपासी अधिकार यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.
न्यायालयासमोर आलेले साक्षी पुरावे तसेच अतिरीक्त सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी समिर चाँदभाई पठाण याला दोषी धरले. पठाण यास जन्मठेप व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्याचा सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली. इतर दोन आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सोडले.