Onion Rate : गेल्या काही महिन्यांपासून निसर्गाचा लहरीपणा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा मारक ठरत आहे. गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर 2023 या चार महिन्यांच्या काळात मान्सून काळात महाराष्ट्रात खूपच कमी पावसाची हजेरी लागली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिक पेरणीवर विपरीत परिणाम झाला आहे.
कमी पावसामुळे खरिपातील लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे. खरीप हंगामातील कांदा लागवडीवर देखील कमी पावसाचा परिणाम पाहायला मिळाला आहे. कमी पावसामुळे खरीप कांदा लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे. विशेष म्हणजे रब्बी हंगामाला देखील कमी पावसाचा फटका बसला आहे.
शिवाय गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या संकटामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता शिवाय या चालू वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली.
एवढेच नाही तर या चालू फेब्रुवारी महिन्यातही अवकाळी पावसाचे त्राहीमान पायाला मिळाले आहे. 10 फेब्रुवारीपासून राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीट झाली आहे. यामुळे, रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा ही पिके पूर्णपणे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले हरभरा आणि गव्हाचे पीक अवकाळीमुळे आणि गारपिटीमुळे क्षतीग्रस्त झाले आहे. सोबतच अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा कांदा पिकाला देखील फटका बसला आहे. एकीकडे नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे तर दुसरीकडे शेतमालाला देखील बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये.
सध्या बाजारात सोयाबीन आणि कापूस हमीभावापेक्षा कमी दरात विकला जात आहे. तर कांदा या नगदी पिकाला देखील बाजारात खूपच कमी भाव मिळत आहे. राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा अवघा एक ते दोन रुपये प्रति किलो या दरात विकला जात आहे. यामुळे पिकासाठी आलेला खर्च देखील वसूल होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी जाहीर केली. याचा परिणाम म्हणून देशांतर्गत कांद्याचा साठा वाढला आहे. यामुळे बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत असून काही बाजारांमध्ये दोन-दोन दिवस लिलावच होत नाहीयेत.
कांदा ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांकडे जागा नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान या साऱ्या विपरीत परिस्थितींचा व्यापारी वर्ग फायदा उचलत आहे. व्यापाऱ्यांकडून कांद्याला मात्र एक ते दोन रुपये प्रति किलोचा कवडीमोल दर दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात आणि व्यापाऱ्यान विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
अहमदनगर आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला एक रुपयाचा भाव महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त माहितीनुसार, 12 फेब्रुवारीला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 45 हजार 520 क्विंटल कांदा आवक झाली.
या मालाला किमान 100 रुपये, कमाल 1850 रुपये आणि सरासरी 1100 रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे. त्याचप्रमाणे 12 फेब्रुवारी रोजी अहमदनगर मार्केटमध्ये 48415 क्विंटल कांदा आवक झाली. या मालाला येथे किमान 100 रुपये, कमाल 1500 रुपये आणि सरासरी 850 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे.
राज्यातील इतर बाजारांमधील भाव
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 400, कमाल सोळाशे आणि सरासरी 1000 रुपये असा भाव मिळाला आहे.
छत्रपती संभाजी नगर : येथील मार्केटमध्ये कांद्याला किमान 200, कमाल 1400 आणि सरासरी 800 असा भाव मिळाला आहे.
खेड APMC : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 700, कमाल चौदाशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये किमान 200, कमाल 1400 आणि सरासरी १०५० रुपये प्रतिक्विंटल असा भाव नमूद करण्यात आला आहे.