Marathi News : आपण भारतीय आहोत एवढाच अभिमान मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, याचा आपल्याला वाटला पाहिजे. गेल्या ६० वर्षांत देशाचा विकास हा काँग्रेस नेतृत्वाखालील झाला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात फक्त कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी व काँग्रेसच समर्थ असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकरराव नवले यांनी केले.
अकोले येथील शासकीय विश्रामगृहावर शनिवारी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबद्दल आयोजित सत्कार समारंभात नवले बोलत होते. प्रास्ताविक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे यांनी केले.
यावेळी काँग्रेस पक्ष विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ नोव्हेंबर रोजी अकोले तालुक्यातील देवगाव येथे आद्य क्रांतीकारक क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले असल्याची माहिती देण्यात आली.
अच्छे दिन नको, चांगले दिन हवेत
काँग्रेस पक्षाला अच्छे दिन नकोतच, तर चांगले दिन हवेत. तीन महिन्यांत लोकसभा निवडणुकांना सामोरे जावे लागेल. महिला व युवक काँग्रेसला सतर्क करा. अकोल्याने मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारास मोठे मताधिक्य दिले, असे राज्य महिला आयोगाच्या सदस्य व प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी सांगितले.
यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, ज्येष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे, भास्कर दराडे, अगस्तीचे संचालक मीनानाथ पांडे, तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे, ज्ञानेश्वर झडे, सतीश भांगरे, भास्कर दराडे, अनुराधा आहेर यांची भाषणे झाली.
बैठकीस साईनाथ नवले, रामदास धुमाळ, रजनीकांत भांगरे, अँड. भाऊसाहेब नवले, पोपटराव नाईकवाडी, रामदास सोनवणे, देवराम कुमकर, ममता धुमाळ, बाळासाहेब वाजे, अनुराधा आहेर, अण्णासाहेब एखडे आदी उपस्थित होते. काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मधुकरराव नवले, मीनानाथ पांडे व दादापाटील वाकचौरे यांचा,
तर सरचिटणीसपदी सतीश भांगरे, बाळासाहेब नाईकवाडी, अरिफभाई ताबोळी, फैजान भाई तांबोळी, झानेश्वर झडे, सेक्रेटरी मिनाक्षी शेंगाळ व प्रा. बाळासाहेब शेटे, वैद्यकीय सेलचे जिल्हा सचिव डॉ. जयसिंग देशमुख व तालुकाध्यक्ष डॉ. अरुण बोंबले,
सचिव डॉ. सचिन हाडवळे, कार्यकारणी सदस्य रमेशराव जगताप, मंदाबाई नवले यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा उपाध्यक्ष मीनानाथ पांडे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सतीश पाचपुते यांनी केले. प्रा. बाळासाहेब शेटे यांनी आभार मानले.