अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- स्व.बापूंची शिकवण व वारसा घेवूनच संचालक मंडळ कारभार करीत आहे. मात्र हे काहींच्या डोळ्यात खुपत असल्याने कुरघोडी व बदनामीचे राजकारण केले जात आहे.
पारदर्शक कारभारावर आक्षेप घेवून सभासदांची दिशाभूल करण्याचा डाव या विघ्नसंतोषी सत्तालालची मंडळीनी आखला आहे. ज्यांना सभासद, शेतकरी, कामगार व सामान्य जनतेचे घेणे देणेच नाही अशी मंडळी केवळ सत्तेवर डोळा ठेवून आडतांडव करीत आहेत.
मात्र सभासद राजहंसासारखे आहेत. विनाकारण व दिशाभूल करणारे आरोप करणाऱ्या या चौकडीला सभासदच त्यांची जागा दाखवून देतील. असा टोला नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी लगावला.
राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष स्व.शिवाजीराव नागवडे यांचे स्मृतीदिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नाहाटा म्हणाले की, स्व.शिवाजीराव नागवडे हे द्रष्टे नेते होते.
बापूंच्या अपार कष्ट, परिश्रम व त्यागातून ‘नागवडे’ कारखाना गेली ५५ वर्षे येथील शेतकरी, कामगार व सामान्यांची कामधेनू म्हणून काम करीत आहे.
मात्र काही सत्तालोलूप नतद्रष्ट लोकांनी स्व. बापूंचे नाव घेऊन कारखान्यात धूडगूस घालण्याचा घाट घातला आहे. कारखान्याची सत्ता हस्तगत करुन येथे धूडगूस घालण्याचा या नतद्रष्ट मंडळींचा घाट आहे. या अपप्रवृत्तीला सभासद कात्रजचा घाट दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.