अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- महापालिकेच्या बांधकाम विभागात शाखा अभियंत्यांची दहा पदे मंजूर आहेत. वाढीव भागात पायाभूत सुविधा पुरविण्याची महापालिकेची जबाबदारी आहे.
परंतु, पुरेशा प्रमाणात अभियंते नाहीत. बांधकाम विभागाची धुरा केवळ दोन अभियंत्यांवर आहे. एकाच विभागात गेल्या अनेक वर्षांपासून हे दोन्ही अभियंते काम करत आहेत. त्यामुळे त्यांचे हितसंबंध तयार झाले आहेत. नगरसेवकांशीही त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.
नगरसेवकांशी असलेली मैत्री जपत काम करत आहेत. कामावर हजर झाल्यापासून ते बांधकाम विभागातच कार्यरत आहेत. शहर अभियंते बदलेले; परंतु, शाखा अभियंता तेच आहेत. त्यामुळे नवीन कल्पना शहराला मिळत नाहीत. रस्ते व गटारींची तीच ती कामे दरवर्षी होत असून, त्यावर लाखो रुपये खर्च होत आहेत.
शहरातील कामांच्या दर्जाबाबत नगरसेवकांकडून तक्रारी केल्या जातात. परंतु, अभियंते नसल्याने कारवाई केल्यास काम करणार कोण, असा प्रश्न प्रशासनाकडून उपस्थित केला जातो. दरम्यान शहरात १७ प्रभाग आहेत.
यात मध्यवर्ती शहराची जबाबदारी शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर यांच्याकडे, तर सावेडीसह बोल्हेगाव, नागापूर आदी उपनगरांसाठी शाखा अभियंता एम.एस. पारखे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
या भागातील रस्ते, गटारींच्या कामांचे अंदाजपत्रक तयार, निविदा प्रक्रिया राबविणे, कार्यारंभ आदेश दिलेली कामे सुरू करणे, कामांची पाहणी करणे, कामाचा दर्जा राखणे, ही सर्व कामे या दोन शाखा अभियंत्यांनाच करावी लागतात.
त्यांचा सर्वाधिक वेळ कामांची पाहणी करण्यात जातो. विशेषबाब म्हणजे हे दोन्ही अभियंते वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करत आहेत. बांधकाम विभागात केवळ दोन अभियंते असल्याने त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यांच्यावर अनेक आरोप झाले; मात्र हे दोन्ही अभियंते आपल्या जागेवर टिकून आहेत.