अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- संगमनेर तालुक्यातील हसनाबाद (तळेगाव दिघे) शिवारात अचानक आग लागून सव्वा एकर क्षेत्रातील सुमारे २०२ डाळिंबाची झाडे आगीत जळून खाक झाली.
डाळिंब बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने या शेतकऱ्याचे सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली.
या घटनेमुळे शेतकऱ्यास मोठा आर्थिक फटका बसला आहे. तळेगाव दिघे ते कोपरगाव रस्त्याच्या पश्चिमेला हसनाबाद (तळेगाव दिघे) शिवारात तळेगाव सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम तुळशीराम दिघे यांची शेतात वस्ती आहे.
वस्तीनजीक हाकेच्या अंतरावर सव्वा एकर क्षेत्रात त्यांची डाळिंब बाग आहे. सोमवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास बागेला अचानक आग लागली. थोड्याच वेळात आग बागेत सर्वत्र पसरली.
तुकाराम दिघे यांचा मुलगा अनिल दिघे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांच्यासह कुटुंबियांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला.
आगीत २०२ डाळिंबाची झाडे व बागेतील ठिबक सिंचन संचदेखील जळून गेला. या डाळिंब बागेवरून वीजवाहक तारा गेलेल्या असून,
या तारांचे घर्षण होत ठिणग्या पडल्याने आग लागली असावी, अशी शक्यता तुकाराम दिघे यांनी व्यक्त केली. तरी महसूल विभागाने जळालेल्या या बागेचा पंचनामा करावा, अशी मागणी केली आहे