अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. भारतीय संस्कृतीत पत्नीला विशेष महत्त्व दिले आहे. आयुष्याच्या प्रवासात येणाऱ्या अडचणीच्या काळात तीच आपल्या पाठीशी खंबीर उभी राहते. परंतु आगामी काळात होणाऱ्या पत्नीलाच आत्महत्येस प्रवृत्त केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणी राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील एका तरूणावर राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, देवळाली प्रवरा येथील शितल राजेंद्र देठे हिचे गणेगाव येथील सुयोग सुभाष कोबरणे याच्याशी लग्न जमविले होते. त्यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम ठरला होता.
सुयोग कोबरणे व शितल हे लग्न ठरल्यापासून दोघेही फोनवर बोलायचे, तसेच व्हॉट्सॲपवर चॅटिंग करायचे. दि.१२जुलै रोजी शितल व सुयोग कोबरणे यांचे फोनवर संभाषण झाले त्यावेळी ती नाराज दिसली म्हणुन आईने तिला विश्वासात घेऊन विचारले तेव्हा तिने सांगीतले की,
सुयोग याने माझ्याशी लग्नास नकार दिला असुन तु दुसरा मुलगा पाहा, मला तुझ्यासोबत लग्न करायचे नाही, असे सांगितले. त्यावेळी मी मुलीस थोडा धीर देऊन समजावुन सांगीतले. त्यानंतर रात्री सुयोग कोबरणे याचा फोन आला की, शितल माझा फोन उचलत नाही. तुम्ही घराबाहेर जाऊन पाहा,
असे सांगितल्याने मी घराबाहेर येऊन पाहिले असता, मला मुलगी शितल हिने आमच्या गायीच्या शेडमधील गोठ्यात ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेला दिसली. अशी फिर्याद मयत मुलीची आई रोहिनी राजेंद्र देठे यांनी दिली. या फिर्यादीवरून सुयोग सुभाष कोबरणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.