अरेरे! घरातील दागिने दुकानात ठेवले मात्र ….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- कृषी उत्पन्न बाजार समितीतील दुकान मंगळवारी रात्री १.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरांनी फोडल्याची घटना घडली आहे. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात सुमारे १ लाख ८५ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. नेवासा फाटा येथील रहिवासी देविदास सदाशिव साळुंके (वय ५९) यांचे नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्य खरेदी- विक्रीचे दुकान आहे.

ते नेवासा फाटा येथे राहत असल्याने व त्यांचे घर हायवे रोडलगत असल्याने घरातील महिलांचे दागिने व रोख रक्कम सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी दुकानातील लोखंडी कपाटामध्ये ठेवले होते. दि. ७ मार्च रोजी रविवारी रात्री सात वाजेच्या सुमारास ते पुणे येथे कामासाठी गेले होते.

दि. ८ मार्च रोजी त्यांचा मुलगा प्रितम याने दिवसभर कम केल्यानंतर रात्री ८ वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. त्यानंतर रात्री चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले व चोरी केली. दुकानात जाऊन खात्री केली असता कपाटातील रोख रक्­कम व सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे आढळून आले.

यात ६० हजार रुपये किंमतीच्या दोन तोळे वजनाच्या सोन्याच्या अंगठया, कानातली फुले, वेल व बिंदी, दोनशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दोन मेखले, एक बाजुबंद, पायातल्या तीन चैन तसेच एक लाख रुपये रोख असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी श्वान पथकही पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24