अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या निर्बंधामुळे सर्व व्यापार व व्यवसाय बंद पडले आहेत. मोठ्या शहरांतील दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटल्याने दूध दर कमी झाले आहेत.
उन्हामुळे दुधाचे उत्पादन घटले असतानाच दरातही घट झाल्याने दुग्ध व्यवसाय अडचणीत आल्याने पशुपालक शेतकरी परत संकटात सापडला आहे. गतवर्षी कोरोना टाळेबंदीच्या काळात घसरलेल्या दुधाचे दरात मध्यंतरी वाढ झाली होती.
परंतु सध्या कोरोनाच्या निर्बंधामुळे प्रति लिटर ४ रुपयाने दर घसरले आहेत. दुध दरात झालेल्या घसरणीमुळे पशुपालकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. ग्रामीण भागात शेती साठी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.
त्यासाठी जनावरांना हिरवा चारा, वैरण व खुराकाची आवश्यकता असते. भूसा व पेंडीचे दर गगनाला भिडले आहेत व दुधाचे दर मात्र कमी झाले आहेत त्यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे .
वरचेवर होणाऱ्या दूर दरवाढीतील कपातीमुळे दुग्ध उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत आहे. मागील महिन्यात गाईच्या दुधाला २८ तर म्हशी च्या दुधाला ४० रुपये दर दिला जात होता. कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली अनं शासनाने कडक निर्बंध लागू केले.
त्यामुळे मुंबई, पुणे सारख्या महानगरातील दुधाची मागणी घटली. याचा परिणाम म्हणून आज रोजी गाईचे दुध २४ रुपये तर म्हशीचे दुध ३८ रुपये लिटरने खरेदी केले जात आहे.
मागील तीन महिन्यां पासून दुधाला मिळत असलेला चांगला दर कोरोनाच्या निर्बंधामुळे झालेल्या दर कपातीमुळे पुन्हा खाली आल्याने पशु पालकातून नाराजी व्यक्त केली जात असून पशुखाद्याचे दर कमी करण्याची मागणी होत आहे .