अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-देवळाली प्रवरा बाजारतळ येथे कुलूपबंद अवस्थेत असलेले महिला शौचालय तात्काळ खुले करा अन्यथा कुलूप तोडो आंदोलन केले जाईल असे निवेदन आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे सह देवळाली प्रवरा येथील महिलांनी नगरपालिका मुख्याधिकारी आणि राहुरी पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.
दरम्यान मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, देवळाली प्रवरा बाजारतळ येथे दर शनिवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारामध्ये जवळपासच्या गावांमधून महिला शेतकरी,
महिला व्यापारी, महिला ग्राहक आदी मोठ्या संख्येने येतात. शेतकरी व व्यापारी महिलांना दिवसभर बाजारात शेतमाल विक्री करण्यासाठी व व्यापार करण्यासाठी बसून राहावे लागते.
बाजाराची गर्दी व जवळपास सर्व गावठाण इमारती आणि घरे असल्याने या महिलांना नैसर्गिक विधीसाठी बाहेर जाता येत नाही. तसेच नैसर्गिक विधी शिवाय दिवसभर एका जागेवर बसून राहिल्याने या महिलांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
देवळाली प्रवरा बाजारतळावर पोस्ट ऑफिस लगत नगरपालिकेने दोन महिन्यांपूर्वी महिला शौचालय बांधले असून कुलूपबंद अवस्थेत हे शौचालय बंद ठेवून नगरपालिकेने या महिलांना वेठीस धरले आहे.
तरी, देवळाली प्रवरा बाजारतळावरील कुलूपबंद महिला शौचालय महिलांच्या वापरासाठी तात्काळ खुले करून देण्यात यावे. अन्यथा कोणत्याही क्षणी या शौचालयाचे कुलूप तोडून महिला त्याचा वापर सुरू करतील.
व त्यामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्यास सर्वस्वी देवळाली प्रवरा नगरपालिका जबाबदार राहील याची कृपया नोंद घ्यावी असे निवेदनात शेवटी म्हंटले आहे.
यावेळी आप्पासाहेब ढुस यांचेसह आशाबाई माळी, लता सोनवणे, सिंधू दळवी, सुंदरबाई पाणपाटील, मीना कोतकर, फरीदा शेख, अमरीन शेख, तमेजा शेख, सुमय्या शेख आदी महिला उपस्थित होत्या.