राज्य सरकार पाडण्याच्या व पडण्याच्या स्वप्नांतून विरोधक बाहेर पडायला तयार नाहीत…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :-  राज्य सरकार पाडण्याच्या व पडण्याच्या स्वप्नांतून महाराष्ट्रातील विरोधक बाहेर पडायला तयार नाहीत. त्यांची अवस्था ‘बेघर आणि बेकार’ असल्यासारखी झाली आहे, अशी टीका शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून केली आहे.

विधीमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. यावरुन शिवसेनेने विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. अनिल देशमुखांपासून अनिल परब, प्रताप सरनाईक, रोहित पवार, अजित पवारांवर कारवाया करून महाराष्ट्र सरकारची कोंडी करता येईल या भ्रमात विरोधी पक्षाचे भोपळे आहेत.

या भोपळय़ांनी कितीही टुणूक टुणूक केले तरी सत्तेचा सोपान त्यांना पार करता येणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी जोरदार रणनीती ठरवली जाते. ही रणनीती म्हणजे काय, तर सरकारला बोलू द्यायचे नाही.

सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडायचे. विधानसभा अध्यक्षांसमोरील मोकळय़ा जागेत घुसून घोषणाबाजी करायची. हीच रणनीती यावेळीही ठरलेली दिसते. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात यापेक्षा वेगळे काही करील अशी शक्यता दिसत नाही.

या प्रश्नी राज्य सरकारची कोंडी करण्याची खुमखुमी विरोधी पक्षाला असेल तर मराठा समाजाचे गुन्हेगार म्हणून केंद्र सरकारलाही मोकळे सोडता येणार नाही. केंद्र सरकारची पुनर्विचार याचिकाच फेटाळण्यात आल्यामुळे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.

पण या सगळय़ाचे राजकारण न करता सगळय़ांनी एकत्र बसून मार्ग काढायचा आहे. सरकारपुढे अडचणी निर्माण करण्याचे उद्योग कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने जोरदार आघाडी घेतली आहे. लसीकरणाचा विक्रम घडवत महाराष्ट्र पुढे जात आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला आहे.

इतर राज्यांत भडकलेल्या चिता आणि गंगेत तरंगणाऱया प्रेतांचे भयंकर चित्र विरोधी पक्षाला अस्वस्थ करीत असेल तर त्यांनी महाराष्ट्रातील उत्तम कामगिरीबद्दल ठाकरे सरकारचे आभारच मानायला हवेत.

समाजातील बेघर आणि बेकार ही नक्कीच एक गंभीर समस्या आहे, पण राज्यातील बेघर आणि बेकार विरोधी पक्षाचे काय, हा खरा प्रश्न आहे. ‘समाजातील बेघर व बेकारांची चिंता सगळय़ांनाच असते, पण बेघर व बेकारांनी देशासाठी काहीतरी कामही करायला हवे.

बेघरांना सरकार सर्वकाही पुरवू शकत नाही,’ असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदविले आहे. सत्तेचे छप्पर उडाल्याने बेघर आणि बेकार झालेल्या राज्याच्या विरोधकांनीही राज्यासाठी काही काम करायला हवे.

मात्र तसे न करता काम करणाऱया सरकारपुढे अडचणी निर्माण करण्याचे उद्योग ते करीत आहेत,” अशी टीका शिवसेनेने केली आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांवर त्यांनी जरूर बोलावे. नुसते बोलू नये तर सरकारकडून कामे करून घेतली पाहिजेत. पण तसे काही न करता विरोधी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांचा ‘चाप’ लावून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना, आमदारांना त्रास देत आहे, असं शिवसेनेने सांगितलं आहे.

सरकार पक्षावर आरोपांच्या फैरी झाडून नामोहरम करणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्यच आहे, पण त्या आरोपांत थोडे तरी तथ्य असायला हवे. महाराष्ट्रापुढे जे प्रश्न आहेत त्यातले अर्ध्याहून जास्त प्रश्न केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळेच निर्माण झाले आहेत. मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण हे तर पूर्णपणे केंद्र सरकारनेच हाताळायचे व निर्णय घ्यायचे विषय आहेत. या प्रश्नी राज्याच्या विधानसभेत गोंधळ घालून काय साध्य होणार?,”

अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. मोदी यांच्या दारात बसून आक्रोश करावा काय? “मराठा समाजाला आरक्षण मिळू देण्यात सरकारचे कायदेशीर प्रयत्न कमी पडल्याचा विरोधी पक्षाने सुरू केलेला बोभाटा एक बकवास आहे.

मुळात सत्य असे आहे की, मराठा आरक्षणासंदर्भात 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा मराठा आरक्षणाबाबत केलेला कायदा रद्द केला. असा कायदा करण्याचा राज्य सरकारला अधिकार नसल्याचे सर्वोच्च न्यायालय सांगत आहे, पण आता त्याबाबत केंद्र सरकारने जी पुनर्विचार याचिका दाखल केली तीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

मग केंद्र सरकारही मराठा समाजाला आरक्षण देण्यात कमी पडले म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या दारात बसून आक्रोश करावा काय? हे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने स्पष्ट करायलाच हवे,” असं शिवसेनेने सुनावलं आहे.

अहमदनगर लाईव्ह 24