जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- जिल्हा पोलिस दलात नेहमीच मोठी उत्सुकता असलेल्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 30 आणि 31 जुलै असे दोन दिवस जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या देखरेखीखाली जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या पॅनलद्वारे प्रशासकीय आणि विनंती बदल्यांची प्रक्रिया पार पाडण्यात आली.

बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना 3 ऑगस्ट रोजी कार्यमुक्त करून त्यांना तात्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश आहेत. पोलीस शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावरील या बदल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर 173 बदल्या होत्या. त्यातील 39 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना एक वर्ष स्थगिती देण्यात आली आहे.

20 कर्मचाऱ्यांच्या बदलीचे ठिकाण स्वतंत्र आदेश काढून करण्यात येणार आहेत. तर दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागात प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. त्यामुळे 173 पैकी 112 कर्मचाऱ्यांना प्रत्येक्षात 3 ऑगस्ट रोजी सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणाहून कार्यमुक्त करण्यात येईल.

विनंती बदली साठी 344 कर्मचाऱ्यांनी विनंती अर्ज जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाकडे अर्ज केले होते. त्या पैकी 190 जणांना विनंती बदली देण्यात आली असून 154 कर्मचाऱ्यांचे विनंती बदली अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांनी 3 ऑगस्ट रोजी आपल्याकडील प्रलंबित तपास, गुन्हे, अर्ज, प्रकरणे चार्ज यादीसह ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करावयाचा आहे. तसेच त्याच दिवशी कार्यालयीन कामकाज पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यास बदलीच्या ठिकाणासाठी कार्यमुक्त करावे लागणार.

तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश प्रभारी अधिकाऱ्यांना असून तसे न केल्यास प्रभारी अधिकाऱ्यावर कडक शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार आहे. याकामी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी प्रक्रियेवर लक्ष द्यावे लागणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24