अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही संगमनेर शहर व परिसरात मात्र खुलेआम गुटखा विक्री सुरू होती. दरम्यान या बेकायदेशीर गुटखा विक्रीला पोलिसांचे छुप्या पद्धतीने सहकार्य असल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर संगमनेर शहरातील बेकायदेशीर गुटखा विक्री त्वरीत बंद करण्यात यावी असे आदेश पोलिस अधिकार्यांनी दिले आहे.
पोलिसांच्या या आदेशाला काय प्रतिसाद मिळतो हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. संगमनेर शहर व परिसरात बेकायदेशीर गुटखा विक्री व्यवसायातून दर महिन्याला तब्बल सहा कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल होत होती. तालुक्यात व शहरात गुटखा विक्रीची मोठी साखळी आहे.
पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती असतानाही या गुटखा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली जात नव्हती. आर्थिक लागेबांधे असल्यामुळे गुटखा विक्रेत्यांचे चांगलेच फावले होते. संगमनेर शहर व परिसरात गुटखा विक्रीचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. कायद्याने गुटखा विक्रीला बंदी असतानाही संगमनेर तालुक्यात तब्बल साडेसहा कोटी रुपयांची उलाढाल गुटखा विक्री व्यवसायातून होत असल्याचे समोर आले आहे.
संगमनेरातील गुटखा विक्रीकडे अन्न व भेसळ विभागाचेही दुर्लक्ष झाल्याचे होत आहे. या खात्याचा एकही अधिकारी संगमनेरात गुटखा विक्रीवर कारवाई करताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी बंद असलेला गुटखा आर्थिक तडजोडीतून सुरू करण्यात आला होता.
मात्र पोलिसांनी शहरातील गुटखा विक्री बंद करण्याचा आदेश दिला आहे. पोलिसांनी जरी हा आदेश दिला असेल तर यावर कसा प्रतिसाद मिळतो हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे.